औरंगाबाद: शहराचे नवनिर्वाचित खा. इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकरी आत्महत्येचा मुद्दा संसदेत उपस्थित करून सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील या अतिशय ज्वलंत प्रश्नावर जलील यांनी संसदेत भाष्य केल्याचा हा व्हिडियो समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सोशल मीडियावर जलील यांच्या भाषणाचीच चर्चा आहे.
महाराष्ट्र मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या संकटाने हैराण आहे. यामुळे शेतकरी आत्महत्येचा प्रश्नदेखील गंभीर बनला आहे. याच ज्वलंत प्रश्नाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत वाचा फोडली. ते म्हणाले, २०१५ पासून ते २०१८ पर्यंत १२ हजार २१ शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आहेत. तर जानेवारी २०१९ ते ते मार्च पर्यंत अवघ्या तीन महिन्यात ८०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यासाठी ही गोष्ट नक्कीच भूषावह नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने सोडवण्याची गरज असल्याचे जलील यांनी म्हटले आहे.
"मी पत्रकार असताना जेव्हा शेतकरी आत्महत्येच्या बातम्या कव्हर करण्यासाठी जायचो तेव्हा आम्हाला वाईट वाटायचे. तेव्हा पहिल्या पानावर आत्महत्येच्या बातम्या यायच्या. आता, रोजच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याने त्याकडे कुणीही गांभीर्यने पाहत नाही. त्यामुळे आता आत्महत्येच्या बातम्यांदेखील येत नाहीत" असे जलील यांनी म्हटले आहे.
जलील यांच्या या व्हिडियोला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असून हजारो लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.